पुण्यात फिरणं अवघड, शरद पवारांचे महत्त्वपूर्ण विधान – “नवीन उद्योग शहराबाहेर उभारले पाहिजे”

बातमी इतरांना पाठवा

हडपसर – “पुण्यात उद्योगाचा विस्तार करण्यामुळे पुण्याला ‘उद्योगनगरी’ म्हणून ओळख मिळाली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे वाहननिर्मितीचे महत्त्वपूर्ण केंद्र बनले. मात्र, वाढतं नागरीकरण आणि त्याच्यामुळे होणारा ताण यामुळे पुण्यात फिरणंही अवघड होऊ लागलं आहे. यापुढे, पुण्यात नव्या उद्योगांना शहराच्या बाहेर उभारले पाहिजे,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शरद पवार हे सन्मित्र परिवाराच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आमदार चेतन तुपे, मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे आणि उद्योजक दशरथ जाधव यांसारखे प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, “पुण्यात सध्या ५५ लाख खासगी वाहने आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी गंभीर समस्या बनली आहे. यामुळे, पुण्यात पुढील उद्योग उभारणी साठी शहराच्या बाहेर जावे लागेल.”

शरद पवार यांनी हडपसरच्या इतिहासाबद्दल बोलताना सांगितलं, “पूर्वी हडपसर हे समाजवादी आणि काँग्रेस विचारधारेचं केंद्र होते. अण्णासाहेब मगर आणि रामभाऊ तुपे यांच्याशी राजकीय विरोध असला तरी व्यक्तिगत जीवनात त्यांच्यासोबत विलक्षण स्नेह होता.”

डॉ. श्रीपाल सबनीस यांनी कार्यक्रमात सांगितलं, “आजकाल सर्वत्र मैत्रीला ग्रहण लागलेलं आहे, पण सन्मित्र परिवार प्रेम आणि सच्च्या मैत्रीचा आदर्श देत आहे. सत्य आणि प्रेमाचा संदेश देशाला आज अधिक गरजेचा आहे.”


बातमी इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.