लंडन – (विशेष प्रतिनिधी)
अभियांत्रिकी क्षेत्रात आपल्या कल्पकतेने, समर्पणाने आणि अथक परिश्रमाने महाराष्ट्राचे नाव संपूर्ण जगाच्या नकाशावर झळकवणारे महामार्गांचे शिल्पकार डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना लंडन येथे झालेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन २०२५ या भव्य सोहळ्यात ‘लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, प्रसिद्ध गायिका सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सुनील शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. गायकवाड यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाने दोनदा ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देऊन गौरविले असून, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचा उल्लेख ‘इंजिनिअरिंग मार्वेल’ अशा गौरवोद्गारांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाचे माजी सार्वजनिक बांधकाम सचिव आणि ‘समृद्धी महामार्गाचे शिल्पकार’ म्हणून त्यांची ओळख आज जगभर पोहोचली आहे.
डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी ही महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे, ईस्टर्न एक्सप्रेस वे, मिसिंग लिंक रोड, मुंबई सी लिंक, कोस्टल रोड, मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची उभारणी, मंत्रालय व मुंबई उच्च न्यायालयाचे नूतनीकरण, देशातील सर्वात मोठा महामार्ग असलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, पुणे रिंग रोड, शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या असंख्य महत्वाच्या प्रकल्पांत त्यांच्या दूरदृष्टीचा ठसा उमटलेला आहे.
लंडनसारख्या जागतिक केंद्रावर महाराष्ट्राच्या एका अभियंत्याच्या कार्याचा गौरव होणे, हे केवळ त्यांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे, भारताचे अभिमानाचे क्षण आहेत. अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहता ते केवळ प्रकल्पांचे शिल्पकार नाहीत, तर नव्या युगाचा पाया रचणारे दूरदर्शी अभियंता म्हणून त्यांची ख्याती झाली आहे.
हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना डॉ. गायकवाड यांचे डोळे अभिमान आणि भावनेने दाटून आले होते. त्यांच्या या सन्मानानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, शासकीय व सामाजिक क्षेत्रातून, तसेच अभियांत्रिकी जगतातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून एकच भावना उमटत आहे –
“समृद्धीच्या महामार्गावर घडवणारा हा शिल्पकार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा रत्न आहे!”
सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.