मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा अखेर मुंबईच्या आझाद मैदानात धडकला आहे. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. आंदोलकांनी मुंबईची कोंडी केली असून पोलिस प्रशासनाला मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
मुंबईतलं जरांगेंचं नियोजन
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना महत्त्वाच्या सूचना केल्या. ते म्हणाले –
- “तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग दिलंय. तिथून तुम्ही पाच ते दहा रुपयांत आझाद मैदानात पोहोचू शकता. बिनधास्त गाड्या लावा आणि रेल्वेनं या-जा. संध्याकाळी रेटून जेवा आणि त्या गाडीतच झोपा. इकडं पाऊस अचानक येतो-जातो, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या.”
गोंधळ गडबड नको – जरांगे पाटील
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, “काहीही झालं तरी समाजाला किंमत द्या. आमची लेकरं विजय घेऊन येतील. पण गोंधळ गडबड करायची नाही. अधिकृत पार्किंगमध्येच गाड्या लावा. हायवेवर गाड्या लावू नका. मुंबईकरांना त्रास होऊ नये, ही आपली जबाबदारी आहे.”
आंदोलकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
जरांगे पाटील यांनी आंदोलकांना पुढील सूचना दिल्या –
- अधिकृत ठिकाणीच गाड्या पार्क करायच्या.
- मुंबईकरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायची.
- प्रत्येकाने ड्रायव्हरला फोन करून सांगायचं की पोलिस जिथं सांगतील तिथेच गाडी उभी करायची.
- “एकही गाडी रस्त्यावर उभी राहता कामा नये.”
- “आपण मुंबईत जाम केला ना… आता दोन तासांत मुंबई मोकळी करणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे.”
‘आरक्षणाशिवाय माघार नाही’
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केलं की, “आरक्षणाशिवाय माघार नाही. मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही.”