मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानावर त्यांनी एकदिवसीय आंदोलन सुरू केले असून संपूर्ण राज्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे. जरांगे पाटील हे केवळ मराठा आरक्षणासाठीच नव्हे तर इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांसाठीही लढा देत आहेत. त्यांच्या एकूण सहा प्रमुख मागण्या पुढे आल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण
- मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे मान्य करून, मराठा समाजातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
- या आधारे मराठ्यांना OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे.
- सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी
- ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या आहेत, त्यांच्या सगे-सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळावे.
- यासाठी हैदराबाद, सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करावे.
- आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घ्यावेत
- मराठा आंदोलनादरम्यान विशेषतः अंतरवली सराटी प्रकरणातील आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत.
- समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्यांवर खटले ठेवणे अन्यायकारक असल्याचे जरांगे पाटील यांचे मत.
- शिंदे समितीला मुदतवाढ व तालुकास्तरीय समित्या
- मराठा समाजाच्या नोंदी शोधणाऱ्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी.
- तसेच वंशावळ तपासणीसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र समित्या स्थापन कराव्यात.
- संतोष देशमुख हत्येप्रकरणी कारवाई
- बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कठोर कारवाई व्हावी.
- आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि यामध्ये धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
- ओबीसी प्रवर्गातील प्रगत जातींचे सर्वेक्षण
- दर १० वर्षांनी OBC प्रवर्गातील प्रगत जातींचे सर्वेक्षण करून, त्या आरक्षणातून वगळाव्यात.
- या मागणीमुळे राज्यातील इतर मागासवर्गीय समाजांतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्यांमुळे पुन्हा एकदा राज्यात मोठा राजकीय गहजब उडाला आहे.
- आरक्षणाचा मुद्दा तर आहेच; पण संतोष देशमुख हत्येप्रकरणात थेट धनंजय मुंडेंचे नाव घेऊन त्यांनी केलेली मागणी ही सध्याच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकते.
- दरम्यान, सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.