पुणे-कोलाड महामार्गावरील मुळशी धरण भागातील चाचीवली येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन पंधरा प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. जखमींना पौड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे कोलाड महामार्गावर मुळशी धरण भागातील चाचीवली येथे शुक्रवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजता दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन ते बीड ही एसटी कोकणातून पुण्याकडे येत असताना आणि चिंचवड ते खेड ही एसटी पुण्याकडून कोकणाकडे जात असताना हा अपघात झाला. श्रीवर्धन ते बीड या एसटीचा चालक वळणावर ब्रेक न लागल्याने बस उजवीकडे डोंगराच्या बाजूला घेऊन थांबवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच वेळी समोरून आलेल्या चिंचवड-खेड एसटीची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दोन्ही गाड्यांतील मिळून पंधरा पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, जखमींना तात्काळ मागून आलेल्या दुसऱ्या एसटीमधून पौड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर मुळशीचे तहसिलदार विजयकुमार चोबे, पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे यांनी जखमींना मदत केली.