मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, ही प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरमधील एका कार्यक्रमात महत्त्वपूर्ण विधान केलं. “तामिळनाडूत ७२ टक्के आरक्षण शक्य असेल, तर महाराष्ट्रात का नाही? वेळप्रसंगी घटनेत दुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संसदेत निर्णय घेतला पाहिजे,” असं ते म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
- “आरक्षणाचे प्रश्न सुटवायचे असतील तर राष्ट्रीय पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.”
- “जर गरज पडली तर संविधान दुरुस्तीची आवश्यकता आहे. ही बाब देशातील इतर राज्यांनाही पटवून सांगितली पाहिजे, कारण हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही.”
- “प्रत्येक राज्यात विविध घटक व शेतकरी वर्ग आहेत. त्यामुळे सामूहिक पातळीवर बदल आवश्यक आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.
सध्या राज्य सरकारकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका सुरू आहेत. मात्र शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.