ठाणे :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. उपोषणकर्त्यांसाठी आणि आंदोलनस्थळी दाखल झालेल्या हजारो आंदोलकांसाठी जेवण, नाश्ता आणि पाणी याची व्यवस्था करण्यासाठी ठाणे व कल्याण येथील मराठा समाजाने पुढाकार घेतला आहे.
घराघरातून भाकर-भाजी
ठाण्यातील माजीवाडा-मानपाडा आणि विटावा परिसरात मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या भागातील घराघरातून आंदोलकांसाठी भाकर, भाजी आणि चटणी गोळा केली जात आहे. महिलाही या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत आहेत. कार्यकर्ते ही अन्नपदार्थ गोळा करून थेट मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचवत आहेत. “आंदोलक आपले बांधव आहेत, त्यांची भूक भागवणे ही आपली जबाबदारी आहे,” असे मराठा समाजाचे पदाधिकारी दत्ता चव्हाण यांनी सांगितले.
ठाण्यातील मराठा मंडळाची बैठक
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मराठा मंडळाच्या सभागृहात महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीत आंदोलनकर्त्यांसाठी भोजन, पाणी आणि इतर सोयींची जबाबदारी विभागनिहाय उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्याच दिवसापासून ठाणे शहरातून आनंदनगर चेकनाक्यावरून नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली गेली असून तिसऱ्या दिवशीही ती कायम आहे.
कल्याणमध्ये अन्नछत्र
कल्याणमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत थेट अन्नछत्र सुरू केले आहे. कल्याण बाजारातून भाजीपाला, धान्य आणि इतर साहित्य सकाळी मुंबईत नेले जाते. तिथेच जेवण बनवून आंदोलकांना दिले जाते. पावसामुळे अन्नछत्रासाठी तात्पुरते शेड उभारण्यात आले आहे. “आंदोलनकर्त्यांना उपाशी ठेवायचे नाही, त्यांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
फळे, बिस्कीट व पाण्याचा पुरवठा
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे कुटुंब मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या भागातून आंदोलकांसाठी फळे, बिस्कीट आणि पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी स्वयंस्फूर्तीने तरुण आणि महिला एकत्र येऊन ही सेवा देत आहेत.
मराठवाडा-विदर्भातील मोठा सहभाग
मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील बांधवांची संख्या सर्वाधिक आहे. या भागातील आंदोलकांना ठाण्यातील समाजबांधवांनी आश्रय, भोजन आणि इतर मदत पुरवली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी गेलेले अनेक कोकणातील मराठा बांधव विसर्जनानंतर परत येऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला मिळणारा हा व्यापक पाठींबा केवळ आंदोलनाला बळकट करीत नाही, तर मराठा समाजातील एकोपा आणि बांधिलकीचे दर्शन घडवतो. घराघरातून भाकर-भाजी, कल्याणचे अन्नछत्र आणि ठाण्यातील न थांबणारी सेवा यामुळे आंदोलकांचा आत्मविश्वास वाढला आहे. मराठा आरक्षणाची लढाई केवळ राजकीय पातळीवरच नव्हे तर सामाजिक ऐक्याच्या जोरावरही पुढे सरकत आहे.