---Advertisement---

प्रेमसंबंधातून खून : रत्नागिरीतील बेपत्ता तरुणी भक्ती मयेकरचा मृतदेह आंबा घाटात सापडला

On: August 31, 2025 10:34 AM
Follow Us:
---Advertisement---

रत्नागिरी :
गेल्या १३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भक्ती जितेंद्र मयेकर (२६, रा. मिरजोळे नाखरेकरवाडी, रत्नागिरी) या तरुणीचा खून झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. तिच्या खंडाळा येथील प्रियकरानेच आंबा घाटात खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

१३ दिवसांपासून गायब

भक्ती १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजल्यापासून बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर कुटुंबीयांनी २१ ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना भक्तीचे खंडाळ्यातील एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यानंतर संशयित प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

लग्न ठरल्यानंतर सुरू झाले वाद

पोलिस चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, भक्तीचा प्रियकर काही दिवसांपूर्वी ठरलेल्या लग्नामुळे तिच्यापासून दुरावत होता. त्याचे होणाऱ्या पत्नीसोबतचे फोटो भक्तीने पाहिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. याच वादातून प्रियकराने तिला भेटायला बोलावले. दोघे आंबा घाटाकडे गेले असता पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात प्रियकराने तिचा खून केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कबुली आणि तपास

सुरुवातीला संशयिताने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कसून चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. त्यानुसार, शनिवारी दुपारी पोलिस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आंबा घाट गाठला. तिथे राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमी स्वयंसेवकांच्या मदतीने मृतदेह शोध मोहीम राबवली गेली.

टॅटूमुळे पटली ओळख

दरीतून बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहाचा चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते. मात्र भक्तीच्या हातावरील टॅटूमुळे तिची ओळख निश्चित करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कुटुंबीय आणि परिसरात हळहळ

भक्तीच्या बेपत्तेपणामुळे गेल्या काही दिवसांपासून कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण होते. शेवटी तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिरजोळे आणि आसपासच्या भागातही या प्रकरणामुळे शोककळा पसरली आहे.

पुढील तपास सुरू

या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या खुनामागे इतर कोणते कारण आहे का, किंवा इतर कुणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.