धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्याला भर बैठकीतच जाब विचारत फैलावर घेतल्याची घटना घडली आहे. “तुमच्या बापाचं राज्य आहे का? संविधानापेक्षा मोठे झालात काय?” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यावर रोष व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कामांना मंजुरी देताना खासदारांचा अपमान?
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तुळजापूर व परांडा तालुक्यातील काही कामे मंजुरीसाठी पुढे पाठविण्यात आली. मात्र, स्थानिक खासदार म्हणून या कामांची माहिती आपल्याला देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप खासदार ओमराजे यांनी अधिकाऱ्यांवर केला. “माझ्या मतदारसंघातील काम मला न विचारता कशी मंजुरीसाठी पाठवली?” असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना थेट केला.
“तुम्ही जनतेचे नोकर आहात” – ओमराजे
बैठकीत खासदार ओम राजे निंबाळकर संतापाने अधिकाऱ्यांवर बरसले. “तुम्ही जनतेचे नोकर आहात, जनतेसाठी काम करायला हवे. स्वत:ला संविधानापेक्षा मोठे समजता काय? सत्ताधाऱ्यांचीच कामे करणार आणि विरोधकांची कामे करणार नाहीत का?” अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी अधिकाऱ्यांवर केली.
“हक्कभंगाची कारवाई करीन”
बैठकीत उपस्थित अधिकाऱ्याने उत्तर दिले की, “यादी आधीच तयार झाली होती.” यावर ओमराजेंचा संताप अधिकच भडकला. “मग मला ती यादी दाखवायला लाज वाटत होती का? मी तुम्हाला बघतोच. तुम्हाला सोडणार नाही. माझा विचार केला नाही, याची किंमत मोजावी लागेल. हक्कभंगाची कारवाई करतो,” असा इशारा खासदारांनी दिला.
भर बैठकीत अधिकाऱ्यांची बोलती बंद
ओम राजेंच्या या संतप्त भूमिकेमुळे बैठकीतील वातावरण तापले. अधिकाऱ्यांनी शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला; परंतु खासदारांनी एकामागोमाग एक कठोर शब्दांत प्रश्न विचारून अधिकाऱ्यांची बोलतीच बंद केली. बैठकीत उपस्थित इतर सदस्यही या घटनेमुळे अवाक झाले.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बैठकीत घडलेला हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. लोकांमध्ये याबाबत मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण खासदारांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत, तर काहींनी या घटनेत वापरलेले शब्द अप्रस्तुत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चा
ओम राजे निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बेधडक स्वभावामुळे ते अनेकदा चर्चेत येतात. अधिकाऱ्यांना थेट सुनावल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत असले तरी विरोधकांनी मात्र खासदारांचा संताप हा “लोकप्रतिनिधींनी दाखवायचा शिष्टाचार नाही” अशी टीका केली आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांच्या मंजुरीसंदर्भात अधिकाऱ्यांवर खासदार ओम राजेंनी केलेल्या संतप्त टीकेमुळे पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवादातील दरी स्पष्ट झाली आहे. शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेसाठी असलेल्या महत्त्वाच्या कामांमध्ये राजकारण व मतभेद आडवे आले तर त्याचा तोटा थेट जनतेलाच सहन करावा लागेल. या घटनेनंतर या कामांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.