पनवेलमध्ये रक्तरंजीत थरार – कुख्यात गुंडावर कोयता, तलवारीने सपासप वार; गोल्डन मॅनसह १४ जणांविरोधात गुन्हा

बातमी इतरांना पाठवा

पनवेल : मुंबईला जोडलेले उपनगर म्हणून पनवेलकडे पाहिले जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पनवेलमध्ये गँगवॉरच्या घटना घडत असल्याने परिसर दहशतीत आहे. शनिवारी उफाळलेल्या या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसऱ्याच दिवशी कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये दोन टोळ्यांदरम्यान झालेल्या सशस्त्र हाणामारीने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला आणि सोमवारी प्रमुख संशयितांना अटक केली. या हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले असल्याचे समजते.

पूर्व वैमनस्यातून हिंसाचार
पोलिसांच्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार राजेश जेजुरकर आणि गोरख म्हात्रे या टोळ्यांदरम्यान पूर्व वैमनस्यातून वाद उफाळला. वाद इतका चिघळला की कोयते, तलवारी आणि प्राणघातक शस्त्रांचा वापर करून दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला. या हल्ल्यात राजेश जेजुरकर आणि आकाश नवघणे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कुख्यात गुंडावर प्राणघातक हल्ला
दरम्यान, पनवेलमध्ये आणखी एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पनवेलमध्ये दहशत माजवणारा कुख्यात गुंड राजकुमार म्हात्रेवर खुटारी गावातील अनिकेत म्हात्रे या तरुणाने प्राणघातक हल्ला केला. अनिकेत म्हात्रेची ओळख ‘गोल्डन मॅन’ म्हणून असून, त्याने राजकुमार म्हात्रेवर हल्ला केल्यानंतर हवेत गोळीबार करून परिसरात दहशत माजवली.

प्राणघातक शस्त्रांचा वापर – १४ जणांविरोधात गुन्हा
हल्ल्यात तलवार, बंदूक, हॉकी स्टीकसारखी शस्त्रे वापरण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या राजकुमार म्हात्रेला पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अनिकेत म्हात्रेसह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत म्हात्रे हल्ल्यानंतर फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या संपूर्ण घटनेनंतर पनवेल शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.


बातमी इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.