मुंबई : राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. मात्र सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी होती. आता राज्य सरकारने या निधीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे. याबाबत सरकारने अधिकृत शासन निर्णय (GR) देखील काढला आहे.
सरकारकडून 344 कोटींचा निधी वितरण
महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी एकूण 344.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी वितरित केला गेला आहे. त्यामुळे लाभार्थींना काही दिवसांत पैसे मिळतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शासन निर्णयातील महत्त्वाच्या बाबी
जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना हा आर्थिक लाभ मिळणार आहे. यासाठी सन 2025-26 आर्थिक वर्षात एकूण 3960 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. वित्त विभागाने निधी वितरणाची कार्यप्रणाली निश्चित केली असून त्यानुसार 344.30 कोटी रुपयांचा निधी प्रशासकीय विभाग प्रमुखांना वितरित करण्यात आला आहे.
निधी खर्चाबाबत काटेकोर नियमावली
सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की हा निधी काटकसरीने वापरावा. तसेच याच आर्थिक वर्षात पूर्ण खर्च व्हावा याची दक्षता नियंत्रक अधिकाऱ्यांनी घ्यावी. निधीचा लेखाशिर्षनिहाय व उपलेखाशिर्षनिहाय खर्चाचा अहवाल, तसेच लाभार्थ्यांची माहिती दर महिन्याच्या 10 तारखेला समाजकल्याण आयुक्त व प्रादेशिक उपआयुक्तांना पाठवावी.
दुबार लाभ टाळण्यासाठी खबरदारी
सरकारने हेही स्पष्ट केले आहे की सजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दुसऱ्यांदा मिळू नये याची दक्षता घ्यावी. त्यामुळे दुबार अनुदान मिळण्याची शक्यता टाळली जाणार आहे.
महिलांमध्ये उत्सुकता
या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक महिला गेल्या काही दिवसांपासून आपल्या खात्यात हप्ता जमा झाला आहे का हे पाहत होत्या. आता निधी वितरित झाल्याने कोणत्याही क्षणी हप्ता मिळणार आहे.
या निर्णयामुळे महिलांना घरखर्चासाठी दिलासा मिळणार असून राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ अधिक वेगाने पोहोचेल अशी अपेक्षा आहे.