नेपाळमधील वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरच्या बंदीमुळे देशभर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून काही आंदोलकांनी संसद भवनासह अनेक मंत्र्यांची घरे जाळली. या घडामोडींमुळे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी राजीनामा दिला आणि देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
यावेळी नेपाळमधील परिस्थितीवर भारताचीही नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली असून, मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने या घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि देशातील स्थिरता, शांतता व समृद्धी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
नेपाळमध्ये लष्कराचे प्रमुख अशोक राज सिग्देल यांनी जनतेशी संवाद साधत रात्री १० वाजल्यापासून लष्करी राजवट लागू केली असल्याची घोषणा केली आहे. सिग्देल म्हणाले की, कठीण परिस्थितीत नेपाळचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि नागरिकांचे सुरक्षिततेसाठी लष्कर वचनबद्ध आहे.
सध्या नेपाळमध्ये हिंसाचाराच्या घटनांमुळे जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीचे मोठे प्रमाण नोंदले गेले आहे. लष्करी ताबा लागू झाल्यानंतर प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदाय सध्या नेपाळमधील स्थिरतेसाठी बारीक लक्ष ठेवून आहे. काही दिवसांत परिस्थिती नियंत्रणात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नेपाळमधील राजकीय अस्थिरतेमुळे भारत आणि आसपासच्या देशांमध्ये सुद्धा काळजीचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदींच्या तातडीच्या बैठकीनंतर भारत सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.