पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) आणि परिसरातील वाहतूक कोंडी व नागरी समस्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात पहाटे चाकण दौरा केला होता. या दौऱ्यानंतर आता प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा धडाका लावला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), नगरपरिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) संयुक्त कारवाईत बुधवारी (दि.१०) पोलिस बंदोबस्तात चाकण परिसरातील ४० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. येत्या काही दिवसांत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याआधीच बैठक घेऊन कारवाईसाठी निर्देश दिले होते. नोटिसा देऊनही अतिक्रमणधारकांनी जागा रिकामी न केल्याने अखेर प्रशासनाला ही मोहीम राबवावी लागली. पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण-तळेगाव चौक, आंबेठाण चौक ते एकतानगर रस्त्याच्या एका बाजूने ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि महामार्गावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी साडेबावीस मीटरमधील अतिक्रमणे हटवली जातील. या वेळी एनएचएआयचे सह कार्यकारी अभियंता दिलीप शिंदे, पीएमआरडीएचे रवींद्र रांजणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, पोलीस अधिकारी संजय सोळंके आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ उपस्थित होते.
अजित पवार यांनी यापूर्वी मुंबईत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत चाकणमधील समस्या सोडवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर त्यांच्या पहाटेच्या दौऱ्यात त्यांनी विकासकामांची झाडाझडती घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.