बीड शहरानजीक रामगड परिसरात घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत आढळला असून, दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांचे नावे जयराम शहादेव बोरवडे (वय 30) आणि त्यांची मुलगी अक्षरा जयराम बोरवडे (वय 3) अशी आहेत. चार वर्षांपूर्वी जयराम यांचा विवाह झाला होता. कुटुंबात एकुलती एक मुलगी असल्याने तिच्यावर जयराम यांचे खूप प्रेम होते. परंतु कौटुंबिक कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता, असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
घटनेच्या दिवशी, जयराम सकाळी मुलीला घेऊन घरातून बाहेर पडले. त्यानंतर काही तासांतच त्याचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. मात्र त्याच्यासोबत असलेली तीन वर्षीय मुलगी सापडत नसल्याने कुटुंबीय व पोलिस अधिक चिंतित झाले.
दोन दिवस सतत शोध घेतल्यानंतर अखेर आज सकाळी रामगड परिसरात अक्षराचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी वडिलांनीच मुलीला गळफास दिल्यानंतर स्वतः आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे. घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तीन वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
जयराम यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्याच्या या टोकाच्या निर्णयामागे नेमके कारण काय होते हे आम्हालाही समजले नाही. घटनेच्या दिवशी त्याच्याकडे पैसे नव्हते, त्याने हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी तीस रुपये उधार घेतले होते, असे हॉटेल मालकाने सांगितले. इतक्या मोठ्या पावलामागे कोणता तणाव होता हे अजून स्पष्ट झालेले नाही.
संपूर्ण बीड शहरात या घटनेबाबत विविध चर्चा रंगल्या असून, नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती देण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.