पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “ग्रामपंचायतीपासून मुंबई महापालिकेपर्यंत कितीही आघाड्या झाल्या, तरी राज्यात महायुतीच सत्तेवर येणार आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे शहरातील शिवसेना (शिंदे गट) कार्यालयात सामंत यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख नाना भानगिरे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, “महापालिकेच्या निवडणुकीला महायुतीच्या माध्यमातून लढायचे की प्रत्येक पक्षाने स्वतंत्र, याचा निर्णय महायुतीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांचे प्रमुख नेते घेतील. कोणत्याही नेत्याने स्वबळावर लढण्याचे जाहीर केले तरी त्याला फारसे महत्त्व नाही. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे घेतील.”
ते पुढे म्हणाले, “पक्षात सभासद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच नवे पदाधिकारी नियुक्त केले जातील. पुण्यात आमच्या पक्षात गटबाजी होणार नाही. ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत कोणत्याही आघाड्या झाल्या तरीही महायुतीच सत्तेवर येईल याबद्दल शंका नाही.”
महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत बोलताना सामंत यांनी सांगितले की, नागरिकांनी केलेल्या हरकती आणि सूचना सरकारने नोंदवून घेतल्या आहेत आणि त्यावर योग्य ती दखल घेतली जाईल.
पत्रकार परिषदेत सामंत यांनी शिवसेना (शिंदे गट) चा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावर होणार असल्याचेही जाहीर केले. “या मेळाव्याला लाखो शिवसैनिक सहभागी होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे प्रचंड गर्दी होईल. नियोजनही त्याच प्रमाणात केले जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांवर भाष्य करताना सामंत म्हणाले, “राज ठाकरे यांना मी पाच वेळा भेटलो आहे. ते आमच्यासोबत आले तर त्यात आनंदच आहे. खासदार संजय राऊत काय बोलतात याला फारसे महत्त्व देऊ नका.”
सामंत यांच्या या वक्तव्यामुळे महापालिका निवडणुकीतील महायुतीची रणनीती आणि पुढील राजकीय समीकरणांबाबत नवी चर्चा रंगण्याची शक्यता आहे.