अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात बुधवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सहा महिन्यांपासून पत्नी वेगळी राहात असल्याने रागावलेल्या पतीने मद्यप्राशन करून पत्नीला आणण्यासाठी मेहुणीच्या घरी धाड टाकली. मात्र या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि अखेरीस दोन मेहुणे व त्यांच्या मुलाच्या मारहाणीमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. पातूर पोलिसांनी तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे.
कानशिवणी येथील नागेश पायरूजी गोपनारायण (वय ४०) हे बुधवारी सायंकाळी अंबाशी येथे गेले. मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत त्यांनी मेहुणीच्या घरी जाऊन पत्नीबाबत विचारणा केली आणि वाद सुरू झाला. वाद वाढत जाऊन त्यांनी दोन मेहुण्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक एका मेहुणीच्या मुलाने जवळ पडलेले लाकूड आणि तीक्ष्ण हत्यार उचलून नागेश यांच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत नागेश घरासमोर कोसळले आणि रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आणि पंचनामा केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अंबाशी परिसरात शोध मोहीम राबवली आणि आरोपींना शिताफीने पकडले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सिद्धार्थ शांताराम चोटमल (वय २२), रेखा शांताराम चोटमल (वय ४५, रा. अंबाशी) आणि नंदा दिलीप डोंगरे (वय ४०, रा. मलकापूर) यांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेनंतर अंबाशी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.