छत्रपती संभाजीनगर : लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरील ओळख ठरली महागात – महिलेने खोटे सांगून लग्न, नंतर ५० लाखांची खंडणी मागणी

बातमी इतरांना पाठवा

छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाइन लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर झालेली ओळख एका तरुणाला महागात पडली आहे. बंगळुरूतील महिलेने स्वतःला अविवाहित असल्याचे खोटे सांगून लग्न केले. लग्नावेळी १५ तोळ्यांचे दागिने व कपड्यांचा खर्च केल्यानंतरही तिने पतीसोबत नांदण्यास नकार दिला. उलट पतीवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ७ जून २०२३ ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गारखेडा परिसरात घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४९ वर्षीय रमेश (नाव बदललेले) यांची ओळख लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर रंजिता पितांबर छाबरिया (४७, रा. बंगळुरू) हिच्याशी झाली. रंजिताने स्वतःला अविवाहित व अनाथ असल्याचे सांगितले. तिचा एक भाऊ, बहीण आणि मामा असल्याचे सांगून तीने विश्वास संपादन केला. त्यानंतर दोघांचे ७ जून २०२३ रोजी श्री लक्ष्मी मंदिर, बंगळुरू येथे नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न झाले. लग्नावेळी रमेशने रंजिताला १५ तोळे सोन्याचे दागिने दिले आणि लग्नाचा सर्व खर्च उचलला.

लग्नानंतर काही दिवस ते बंगळुरूत राहिले. मात्र रंजिताने पतीप्रमाणे वागणूक दिली नाही. छत्रपती संभाजीनगरला येण्यास तिने नकार दिल्याने रमेश एकटे परतले. त्यानंतर एका महिन्याने रमेशला बंगळुरू पोलिसांकडून फोन आला आणि रंजिताने सासरी नांदवत नसल्याची तक्रार दिल्याचे सांगण्यात आले. हा कौटुंबिक वाद असल्याचे सांगून पोलिसांनी प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला. परंतु रंजिताने संसार होऊ शकत नसल्याचे सांगितल्याने रमेशचा संशय वाढला.

यानंतर रंजिता आणि तिचा मामा संजय माखिजा (५२, रा. सिकंदराबाद) हे रमेशच्या घरी आले. त्यांनी लग्न मोडायचे असल्याचे सांगून ५० लाखांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे रमेशने जवाहर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, रमेशने रंजिताच्या शेजाऱ्यांकडून चौकशी केली असता तिचा आधीच विवाह झाल्याचे समजले. याशिवाय २०१३-१४ मध्ये ती ज्या कंपनीत काम करत होती, त्या ठिकाणाहून तिच्या ईपीएफओ खात्यात तिने विवाहित असल्याचे नमूद केल्याचा पुरावाही मिळाला. विवाहित असताना खोटे सांगून लग्न करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप रमेशने केला आहे.

या प्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात रंजिता छाबरिया व तिचा मामा संजय माखिजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत असून ही घटना संभाजीनगर शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.


बातमी इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.