केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ई-20 म्हणजेच २० टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीच्या ६५ व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना गडकरी म्हणाले की, “ई-20 इंधनावरून माझ्याविरोधात पैसे देऊन राजकीय मोहीम राबवली जात आहे. इथेनॉलच्या वापराबाबत कोणतीही शंका नाही, हे इंधन किफायतशीर आणि प्रदूषणमुक्त आहे.”
न्यायालयीन निर्णय आणि टीकेला उत्तर
सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ई-20 इंधन अंमलबजावणी कार्यक्रमाला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती. तरीही सोशल मीडियावर या इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची टीका होत आहे. गडकरी यांनी ही टीका राजकीय प्रेरित असल्याचा आरोप केला.
जीएसटी माफीची मागणी
गडकरी पुढे म्हणाले की, नवे वाहन घेताना जुने वाहन विकताना त्यावरील जीएसटी माफ करण्याची मागणी ते अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे करणार आहेत. असा निर्णय झाल्यास ग्राहक आणि वाहन उद्योगाला मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचा फायदा आणि स्वावलंबन
गडकरी यांनी सांगितले की, “मक्यापासून इथेनॉल तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतातील शेतकऱ्यांना तब्बल ४५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. मक्याचा दर १२०० रुपये क्विंटलवरून २८०० रुपये क्विंटलवर पोहोचला आहे. तांदूळ आणि गव्हापासूनही इथेनॉल तयार होत असल्याने शेतकऱ्यांचा अधिक फायदा होतो.”
प्रदूषण कमी करण्यावर भर
इथेनॉलच्या वापरामुळे प्रदूषण घटत असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे लोकांचे आयुष्य १० वर्षांनी कमी होत असल्याचा अहवाल आहे. इथेनॉलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते आणि हे पंतप्रधान मोदींच्या स्वावलंबी भारताच्या स्वप्नाशी सुसंगत आहे.”