बाळासाहेब ठाकरेच ब्रॅण्ड, तुम्ही नाही! भाजपच्या मेळाव्यात CM फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

बातमी इतरांना पाठवा

मुंबई : “नुसते नाव असल्याने कुणी ब्रॅण्ड होत नाही. हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा खरा ब्रॅण्ड होता. तुम्ही ब्रॅण्ड नाहीत,” अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे आणि ठाकरे बंधूंवर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुंबई भाजपतर्फे वरळी डोम येथे मंगळवारी ‘विजयी संकल्प मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नवनियुक्त मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “बेस्टच्या निवडणुकीत काहीजण म्हणाले, आमचा ब्रॅण्ड आहे. परंतु आमच्या शंशाक राव, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी या ब्रॅण्डचा बॅण्ड वाजविला. आमच्या पक्षात अमित साटमसारखा सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होतो. आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रॅण्ड झाला. नरेंद्र मोदी नावाचा जगातील सर्वांत मोठा ब्रॅण्ड आमच्याकडे आहे.”

ते पुढे म्हणाले की, “मुंबईच्या गिरणगावात राहणारा मराठी माणूस आज वसई, विरार, कर्जतला फेकला गेला आहे. आम्ही मात्र बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला. म्हाडाच्या माध्यमातून मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. धारावीच्या दहा लाख लोकांना आम्ही घर देत आहोत आणि प्रत्येकाला धारावीतच घर मिळणार आहे. विरोधकांच्या काळात विकास झाला नाही. बिल्डरच्या दबावाखाली तुम्ही विकास रोखून धरला, पण आम्ही तो पूर्ण करून दाखवला.”

महापौरपदाबाबत मोठा खुलासा
फडणवीसांनी महापालिका निवडणुकीनंतरच्या घडामोडींवरही भाष्य केले. ते म्हणाले, “मागील महापालिका निवडणुकीनंतर भाजपचा महापौर सहज करता आला असता. आमच्या अवघ्या दोन जागा कमी होत्या. आम्ही सारी जुळवाजुळवही केली होती. मात्र मैत्रीच्या नात्यासाठी हे पद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिले. त्या वेळी महापौरपद मिळावे म्हणून मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला होता. मात्र नंतर अनुभव असा होता की ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का…’

या भाषणानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टोलेबाजी करताना “तुमचा ब्रॅण्ड नाही, आमच्याकडे खरा ब्रॅण्ड आहे,” असे सांगून मेळाव्याला रंगत आणली.


बातमी इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.