फडणवीसांचा मित्रपक्षांना अप्रत्यक्ष इशारा? रोहित पवारांची जोरदार टीका

बातमी इतरांना पाठवा

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय संकल्प’ मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणावरून महाराष्ट्रातील राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. “कोणीही एकत्र आले, तरी आमचा विजय थांबवू शकत नाही आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार”, असा ठाम विश्वास व्यक्त करत फडणवीसांनी विरोधकांसह मित्रपक्षांनाही एक प्रकारे संदेश दिला. या वक्तव्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सूचक पण तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीसांचे भाषण – ठाकरे बंधूंवर टीका

वरळी डोम येथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात फडणवीस म्हणाले, “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एक ‘ब्रँड’ होता. पण फक्त ठाकरे हे नाव लावून कोणी ब्रँड होत नाही. मुंबईतील बेस्ट निवडणुकीत आमच्या नेत्यांनी या ब्रँडचा बॅण्ड वाजवला. आज महायुती मजबूत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भगवा झेंडा फडकवू.”

या भाषणात फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवरही अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी म्हटलं, “कोणी आमच्यासोबत येवो वा न येवो, महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार.”

रोहित पवारांचा सूचक इशारा

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले,

“पत्रकारांनी माझं म्हणणं नीट नोंदवून ठेवा, काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार – हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आत्मविश्वास मतदारयादी, ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय येणार नाही.”

पुढे बोलताना त्यांनी भाजपावर मित्रपक्षांना दबावाखाली ठेवण्याचा आरोप केला.

“फडणवीसांनी भाषणात ‘कुणी सोबत आलं तरी आणि कुणी सोबत नाही आलं तरी’ असं सांगून आपल्या मित्रपक्षांनाही संदेश दिला आहे. भाजपाच्या मागे फरपटत यावंच लागेल, असा दम त्यांनी दाखवला आहे. हेच भाजपाचं खरं स्वरूप आहे,” असे रोहित पवार म्हणाले.

राजकीय वातावरण तापले

रोहित पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आधीच मराठा-ओबीसी आरक्षण, बंजारा समाजाच्या मागण्या आणि मुंबईतील आगामी महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. भाजप आणि मित्रपक्ष शिवसेना-शिंदे गट यांच्यातील समीकरणे, तसेच उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीपूर्वी मित्रपक्षांमध्ये खळबळ

राजकीय तज्ज्ञांच्या मते, फडणवीसांचे हे वक्तव्य केवळ विरोधकांवर हल्ला नाही तर मित्रपक्षांसाठीही एक स्पष्ट इशारा आहे. भाजप महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याच्या तयारीत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्यात जागावाटपावरून आधीच पडद्यामागे चर्चा सुरू आहे. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मतदारांची भूमिका ठरणार महत्त्वाची

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यावेळी कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना आहे. उद्धव ठाकरे गट, मनसे आणि इतर विरोधक एकत्र आले तर भाजप-शिंदे गटासाठी ही निवडणूक कठीण ठरू शकते. मात्र फडणवीसांचा आत्मविश्वास पाहता भाजप महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट होते.


बातमी इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.