कोल्हापूर: नवरात्रोत्सव सध्या शिगेला पोहोचला असून, देशभरातून भाविक करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरकडे येत आहेत. वर्षभर गर्दी असणाऱ्या या शक्तिपीठात नवरात्रात भाविकांची प्रचंड रेलचेल असते. पण या मंदिरात असं काय रहस्य आहे जे आजही भाविकांना आणि इतिहासकारांना थक्क करून सोडतं? मंदिरातील तळघर, खजिना, खांबांची मोजणी आणि ७००० वर्षांपूर्वीच्या मूर्तीचा तेजस्वी इतिहास जाणून घेऊया.
मंदिरातील तळघर आणि खजिन्याचं रहस्य
अंबाबाई मंदिराच्या तळघरात अब्जावधींचा खजिना दडलेला असल्याची आख्यायिका आहे. काही वर्षांपूर्वी मंदिर प्रशासनाने हा खजिना मोजताना सोनं, चांदी, हिऱ्यांचे दागिने, सोनसाखळ्या, सोन्याची गदा, चांदीची तलवार, देवीचा मुकुट, श्रीयंत्र हार, सोन्याचे घुंगरू आदी वस्तू नोंदवून ठेवल्या. हा खजिना मोजताना सीसीटीव्ही देखरेखीखाली प्रक्रिया केली जाते आणि प्रत्येक वस्तूला विमा उतरवला जातो. याआधी हा खजिना १९६२ साली मोजण्यात आला होता.
मंदिराचा गूढ इतिहास
अंबाबाई मंदिर साधारण १८०० वर्षांहून अधिक जुनं असल्याचं सांगितलं जातं. शालिवाहन शकातील चालुक्य राजा कर्णदेव यांनी या मंदिराची स्थापना केली. पुढे शिलाहार, आदिलशाही आणि मराठा काळात (शिवराय, जिजाऊ) नूतनीकरण करण्यात आलं. देवीच्या ५१ शक्तिपीठांमध्ये या मंदिराचाही समावेश आहे. अशी श्रद्धा आहे की येथे सतीचं तिसरं नेत्र पडलं होतं, म्हणून येथे महालक्ष्मीचा वास आहे.
७००८ वर्षांपूर्वीची मूर्ती
या मंदिरातील मूर्ती अत्यंत प्राचीन असून, काही विद्वानांच्या मते ती सुमारे ७००० वर्षांपूर्वीची आहे. मंदिरातील शिलालेख आणि पुराणातील उल्लेख याला ऐतिहासिक अधार देतात. मूर्तीच्या तेजामुळेच मंदिराला “करवीरनिवासिनी अंबाबाई” हे विशेष स्थान मिळालं आहे.
खांबांची मोजणी – अजूनही रहस्य
या मंदिरात इतके खांब आहेत की त्यांची संख्या कोणालाच मोजता आलेली नाही. हाताने, कॅमेराने, अगदी संगणकीय पद्धतीने प्रयत्न करूनही मोजणी पूर्ण झालेली नाही. मंदिर प्रशासन म्हणते की खांबांची मोजणी हे अजूनही एक अनुत्तरित रहस्य आहे.
भाविकांसाठी आकर्षण
नवरात्रात दररोज महाआरती, अलंकारपूजा, देवीची पालखी सोहळा अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या काळात लाखो भाविक कोल्हापूरला येऊन देवीच्या दर्शनाने आपलं मनोमन समाधान करतात. मंदिर प्रशासनाच्या मते, या वर्षी नवरात्रात भाविकांची संख्या विक्रमी असण्याची शक्यता आहे.