मुंबई: पवई परिसरातील महात्मा फुलेनगर येथे शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. श्रवण विनोद शिंदे (वय १९) या तरुणाने आपल्या राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या दिक्षा दयानंद खळसोडे (वय १९) हिने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचला.
नेमकं काय घडलं?
शनिवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास श्रवणने आपल्या घरात लोखंडी अँगलला गळफास घेतला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी दुपारी साडेतीन वाजता त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर श्रवणच्या शेजारी राहणारी दिक्षानेदेखील टोकाचं पाऊल उचललं. प्राथमिक माहितीनुसार, श्रवण आणि दिक्षा यांच्यात प्रेमसंबंध होते. श्रवणच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी दिक्षावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला, त्यानंतर तिने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांचा धाडसी हस्तक्षेप
बीट मार्शल एकचे पोलीस हवालदार ठोकळ आणि बीट स्पेशल ससाने यांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेतली आणि दिक्षाच्या घराचा दरवाजा उघडून तिला वाचवलं. सध्या दिक्षावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तपास सुरू
श्रवणने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पार्कसाईट पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.