पुणे, २० सप्टेंबर २०२५: गोवा–पुणे स्पाइसजेट फ्लाइट SG1080 मधील प्रवासादरम्यान पुण्यातील व्यावसायिक अभिजीत भोसले यांच्यासोबत धक्कादायक घटना घडली. फ्लाइटमध्ये दिलेल्या डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तीक्ष्ण तुकडे आढळले आणि हे पेय पिल्यानंतर भोसले यांच्या घशाला इजा झाली. त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने विमान उतरल्यावर तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले.
प्रवाशाची वेदनादायक कहाणी
पत्रकार परिषदेत बोलताना भोसले म्हणाले,
“डाएट कोक घेतल्यानंतर काही घोटांतच माझ्या घशात तीव्र वेदना सुरू झाल्या. सहप्रवासी महेश गुप्ता आणि राजकुमार अगरवाल यांनी मदत केली. पुण्यात पोहोचताच एअरलाईनने रुग्णवाहिका बोलावून मला रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.”
डॉक्टरांनी तातडीची तपासणी करून उपचार केले व पुढील तपासणीसाठी दोन दिवसांनी पुन्हा यावे, असे सांगितले.
दूषित कॅनचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप
भोसले यांनी सांगितले की, कॅनमध्ये स्पष्टपणे धातूचे तुकडे दिसत होते. त्यांनी व सहप्रवाशांनी कॅन पुरावा म्हणून सुरक्षित ठेवण्याची मागणी केली; मात्र क्रू मेंबरने कॅन ताब्यात घेऊन कचर्यात टाकल्याचे सांगितले.
“ही कृती पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न वाटतो,” असे भोसले यांनी आरोप केले.
प्रशासनाला धडक मागण्या
भोसले यांनी स्पाइसजेट, कोका-कोला इंडिया, डीजीसीए, एफएसएसएआय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यांची मागणी –
- स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी
- स्पाइसजेट व कोका-कोला अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
- दूषित कॅनच्या बॅचचे तातडीने रिकॉल
- प्रवासी सुरक्षा व अन्न सुरक्षेच्या उपाययोजना त्वरित राबविणे
भोसले म्हणाले,
“ही घटना केवळ माझ्यापुरती नाही. प्रत्येक प्रवाशाच्या जीविताला धोका आहे. प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं प्रशासनाचं कर्तव्य आहे.”