सांगली : “जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे पक्षाचे प्रत्येक मंडल कार्यालय सुरू झाले पाहिजे. पक्ष हा आमदार-खासदारांच्या कार्यालयातून नव्हे, तर पक्ष कार्यालयातून चालला पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
विश्रामबाग येथे भाजपच्या जिल्हा ग्रामीण कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या वेळी आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर, राज्य संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजप नेते दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संंग्रामसिंह देशमुख, नीता केळकर, संगीता खोत, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, विक्रम पाटील, वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “सांगलीत भाजपचे भव्य जिल्हा कार्यालय साकारत आहे. यास अजून दोन महिने लागतील. मात्र निवडणुका जवळ आल्याने तात्पुरती गरज म्हणून हे जिल्हा ग्रामीण कार्यालय सुरू केले आहे. मंडलस्तरावर पक्ष कार्यालय सुरू करून पक्षाचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालवावे.”
जिल्हाध्यक्ष राहुल महाडिक म्हणाले की, पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करताना सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. “भाजप हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करण्याची संधी देणारा पक्ष आहे. पदापासून वंचित असलेल्या कार्यकर्त्यांनाही दुसऱ्या यादीत संधी दिली जाईल,” असे ते म्हणाले.
या उद्घाटन कार्यक्रमामुळे सांगली जिल्ह्यातील भाजपच्या कार्याला वेग येणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने तयारीला वेग देण्याचे संकेत दिले आहेत.