अमरावती :
अचलपूर विधानसभा मतदारसंघातील तब्बल १० कोटी रुपयांचा विकास निधी मोर्शी मतदारसंघात वळवण्यात आल्याचा आरोप समोर आला असून त्यावरून सत्ताधारी भाजपचे आमदार प्रवीण तायडे आणि प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
“निधी वळवला तो बच्चू कडूंनीच” – आमदार प्रवीण तायडे
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार प्रवीण तायडे म्हणाले की, अचलपूर मतदारसंघातील विकासकामांचा निधी दुसऱ्या मतदारसंघात वळवल्याचा आरोप आपल्यावर होत असला, तरी प्रत्यक्षात हा निधी बच्चू कडूंनीच त्यांच्या पराभवानंतर शासनाकडे पत्र देऊन वळवला आहे.
यासाठी त्यांनी २९ मे २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र दिल्याचा दावा तायडे यांनी केला. या आरोपाचा पुरावा म्हणून तायडे यांनी बच्चू कडू यांच्या लेटरहेडवरील पत्र पत्रकार परिषदेत सादर केले. त्या पत्रात अचलपूरमधील दहा कोटींच्या निधीची कामे रद्द करून ती मोर्शी मतदारसंघात करण्यात यावी, असे नमूद असल्याचे त्यांनी सांगितले.
तायडे पुढे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू हे जिव्हारी लागल्यामुळे जनतेसमोर चुकीचे चित्र रंगवत आहेत. पराभवाची चीड आणि राजकीय आकसातूनच त्यांनी हा निधी वळविण्याची कारवाई केली आहे.”
“ही आमदारांची निष्क्रियता” – प्रहारचा पलटवार
दरम्यान, प्रहार जनशक्ती संघटनेने आमदार तायडे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
प्रहारचे पदाधिकारी म्हणाले, “राज्यात सरकार तुमचे आहे, मुख्यमंत्रीही तुमच्या पक्षाचे आहेत, तर मग अचलपूरचा निधी दुसऱ्या मतदारसंघात कसा वळवला जातो? हा प्रश्न आमदारांनी जनतेला उत्तर द्यावे. स्वतःची निष्क्रियता आणि कामगिरी नसल्यामुळेच आमदार जनतेची दिशाभूल करीत आहेत.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, बच्चू कडू यांनी निधी वळवण्याबाबत कोणतेही पत्र दिलेले नाही. उलट, मागील एका वर्षात बच्चू कडूंनी अचलपूर मतदारसंघात तब्बल ८५० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्याउलट विद्यमान आमदारांनी किती निधी आणला हे जनतेलाही ठाऊक आहे.
“पत्र खोटे, लेटरहेड बनावट” – प्रहारचे आरोप
प्रहारचे पदाधिकारी ऋषिकांत श्रीवास आणि प्रदीप बंड यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, आमदार तायडे यांनी दाखविलेले पत्र हे बनावट लेटरहेडवर तयार केलेले आहे. त्या पत्रावरील सही बनावट असून बच्चू कडू यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
“आमदारांनी सादर केलेले पत्र हे चुकीच्या माहितीवर आधारित असून, लवकरच या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली जाईल,” असा इशारा प्रहारने दिला.
“जनतेची दिशाभूल”
प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अचलपूरचे विद्यमान आमदार लोकांमध्ये चुकीचे संदेश पसरवून स्वतःची निष्क्रियता झाकत आहेत. निधी मोर्शी किंवा वरुड येथे वळविण्याचे आरोप बिनबुडाचे आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “राज्यात सत्ता तुमची असताना आणि शासन तुमचे असताना निधी पळतोच कसा? हेच स्वतःच्या कामगिरीअभावी दाखवलेले राजकीय नाटक आहे.”
राजकीय वातावरण तापले
अचलपूर मतदारसंघात या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
एका बाजूला आमदार प्रवीण तायडे बच्चू कडूंवर थेट निधी वळवल्याचा आरोप करत आहेत, तर दुसरीकडे प्रहार पक्ष त्यांच्यावर पत्र बनावट असल्याचा आणि दिशाभूल करण्याचा गंभीर आरोप करत आहे.
हा वाद पुढे आणखी चिघळण्याची शक्यता असून लवकरच पोलिसांत तक्रार दाखल झाल्यास प्रकरणाला नवे वळण मिळू शकते.