बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी सासुरे गावात कारमध्ये आढळून आला होता. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आत्महत्या आहे की घातपात यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. बर्गे यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मृत्यूभोवती निर्माण झालेले प्रश्न
बर्गे यांच्या मृतदेहासोबत पिस्तुल सापडले. मात्र कुटुंबीयांचे म्हणणे आहे की गोविंद बर्गेकडे कधीच शस्त्र नव्हते. मग पिस्तुल कुठून आले? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे ही घटना आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
नर्तकी पूजा गायकवाडची एन्ट्री
या प्रकरणात नर्तकी पूजा गायकवाडचे नाव सातत्याने समोर येत आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षीच पूजाचे नाव या हत्याकांडात गुंतले आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून कोर्टाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान तिने गोविंद बर्गेशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
या प्रकरणानंतर पूजाच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. घटनेपूर्वी तिचे केवळ ५०० ते ७०० फॉलोअर्स होते. मात्र, १२ सप्टेंबर रोजी ही संख्या तब्बल २४ हजार ७७७ वर पोहोचली आहे. तिच्या अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओंवर मोठ्या प्रमाणावर कमेंट्स येत आहेत. यातील अनेक कमेंट्स शिवीगाळ करणाऱ्या आणि संताप व्यक्त करणाऱ्या आहेत.
गावकऱ्यांचा संताप
गावकऱ्यांनीही या प्रकरणावरून आपला संताप व्यक्त केला आहे. “उपसरपंच गेला हिच्या मुळे, आता सरपंच-उपसरपंच सावध राहा,” अशा कमेंट्स सोशल मीडियावर दिसत आहेत. काही जणांनी मात्र या प्रकरणात फक्त पूजाचाच दोष नाही, असेही म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, “चूक फक्त मुलीची नाही. उपसरपंचचेही चुकले. घरात बायको असतानाही त्यांचे प्रेमसंबंध होते.”
पुढील तपास आणि अपेक्षा
सध्या पोलिस तपास सुरू असून पूजाची चौकशी सुरू आहे. अजून काही नवे खुलासे होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे. गोविंद बर्गे यांच्या मृत्यूने केवळ गावातच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजवली आहे.