धुळे :
धुळ्यातील देवपूर परिसरातील सावरकर पुतळा चौकात सराफ व्यापाऱ्यावर गोळी झाडून झालेल्या दरोड्याचा तपास पोलिसांनी अवघ्या एका महिन्यात उकलला आहे. आंतरराज्यीय टोळीतील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून सोन्याचे दागिने, मोटारसायकल, गावठी बंदूक व धारदार शस्त्रसाहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
गोळीबार करून ३.५ किलो सोने लुटले
२३ जुलै रोजी रात्री आठ वाजता सराफ व्यापारी विनय जैन आणि त्यांचा सहकारी कर्षण मोदी शहादा-धुळे एसटी बसने देवपूर येथे आले. ते बसमधून उतरल्याबरोबर चेहऱ्यावर काळे मुखवटे व हेल्मेट घालून तीन जण मोटारसायकलवर आले. त्यांनी व्यापाऱ्याला घाबरवण्यासाठी हवेत गोळी झाडली आणि ३ किलो ५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व सोने व्यवहाराच्या पावत्यांची बॅग हिसकावून पसार झाले.
या घटनेनंतर देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपासाची सूत्रे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविली.
सीसीटीव्हीने उघडले धागे
या गुन्ह्यात कोणताही थेट साक्षीदार नसताना पोलिसांनी शहरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयित मोटारसायकलचे क्रमांक व हालचालींचा मागोवा घेतल्यावर आरोपी मुंबईमार्गे आले असल्याचे लक्षात आले. तपास पुढे सरकला असता आरोपी उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले.
उत्तर प्रदेशात अटक
संशयितांचा माग काढत पोलिसांनी मुंबईत शोध घेतला, मात्र तेथे ते पसार झाले होते. अखेर प्रतापगढ येथे शोध घेतल्यावर दोघांची माहिती मिळाली. त्यांच्यावर तेथील पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने प्रतापगढ पोलिसांशी संपर्क साधून २३ ऑगस्ट रोजी आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींची ओळख
- मोहंमद शहरेयार मोहंमद इबरार खान (२४, रा. बहरापूर, प्रतापगढ, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम वडाळा, मुंबई)
- दिलशान इमरान शेख (२१, रा. यहियापूर, प्रतापगढ, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम कुर्ला, मुंबई)
दोघांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.
जप्त केलेला ऐवज
दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी तब्बल २ लाख ५१ हजार ७०० रुपयांचे २६२.८०० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोटारसायकल, गावठी बंदूक, दोन बनावट नंबर प्लेट्स आणि धारदार कटर असा मोठा ऐवज हस्तगत केला आहे.
टोळीवर इतर गंभीर गुन्हे
या आंतरराज्यीय टोळीतील आरोपींवर उत्तर प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि शस्त्रसाठा यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. धुळ्यातील सराफ व्यापाऱ्यावर हल्ला ही त्यांची आणखी एक मोठी कारवाई ठरली आहे.
पोलिसांची कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक चेतन मुंढे, सहायक उपनिरीक्षक सतीश जाधव आणि संजय पाटील, राहुल सानप, आरीफ पठाण, पवन गवळी, देवेंद्र ठाकुर, मयूर पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन यांच्या पथकाने केली.