पुणे – पुण्यातील “ड्रीम 11” या फँटसी स्पोर्ट्स गेमिंग ॲपच्या नावाखाली सायबर चोरांनी एका 32 वर्षीय गृहिणीची 14 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना केशनगरजवळील मांजरी बुद्रुक येथील एका महिलेसोबत घडली असून, तिने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅट्सच्या माध्यमातून तिला फसवणूक करणाऱ्या सायबर चोरांशी संपर्क साधला. त्या चोरांनी तिला “ड्रीम 11” मध्ये मोठं बक्षीस जिंकण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर, “ड्रीम 11” मध्ये कर्णधार आणि उपकर्णधारांची योग्य निवड कशी करावी यासाठी मदत करण्याचे सांगून, त्यांनी पैसे मागितले.
14 लाख रुपयांची फसवणूक
सायबर चोरांनी महिलेला सांगितले की, संबंधित संघ जिंकल्यावर त्यांना एक छोटा “सल्लागार शुल्क” द्यावा लागेल. महिलेला सांगितले की जिंकलेल्या रकमेतून 10 टक्के रक्कम त्यांना द्यावी लागेल. हे आमिष स्वीकारून महिलेमध्ये बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात केली, आणि एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनमधून सुमारे 14 लाख 22 हजार 366 रुपये काढून घेतले.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेनंतर महिलेला फसवणुकीचे लक्षात आले आणि तिने पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित व्हॉट्सॲप नंबर, टेलिग्राम चॅट्स आणि बँक व्यवहारांचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सायबर चोरांविरोधात भारतीय दंड संहिता आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सायबर गुन्हेगारांचा नवा ट्रेंड
यासोबतच, सायबर गुन्हेगारांचा नवा ट्रेंड समोर आला आहे. सायबर चोर फँटसी गेमिंग ॲप्सच्या लोकप्रियतेचा फायदा घेत लोकांना फसवण्यात गुंतले आहेत. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर खोट्या व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि टेलिग्राम चॅट्स तयार करतात, जिथे मोठ्या बक्षिसांचे वचन दिले जाते आणि त्यानंतर लोकांना ‘सल्लागार फी’, ‘टॅक्स’, किंवा ‘अनलॉक फी’ अशा नावाखाली लाखो रुपये उकळले जातात.
सावधगिरीचा इशारा
सायबर पोलीस या प्रकाराच्या वाढत्या प्रमाणाबद्दल सावधगिरीचा इशारा देत आहेत. याप्रकारे फसवणूक टाळण्यासाठी, इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अशा आमिषांना फसवणूक मानून शक्य तितकी सावधता ठेवावी लागेल.