नेपाळमधील हिंसाचारानंतर आता फ्रान्समध्येही मोठं आंदोलन उसळलं आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात देशभरात “ब्लॉक एव्हरीथिंग” नावाची मोहीम सुरू झाली आहे.
महामार्ग रोखले, बसेसला आग
आज हजारो आंदोलकांनी देशातील विविध महामार्ग रोखले, बसेसला आग लावली आणि घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरलो. पॅरिससह अनेक मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारने आंदोलकांना रोखण्यासाठी 80 हजार सैनिकांची तैनाती केली असून, यापैकी 6,000 सैनिक पॅरिसमध्ये तैनात असणार आहेत.
पंतप्रधानांविरोधात ठराव, राजकीय गोंधळ तीव्र
अलीकडेच फ्रेंच संसदेत पंतप्रधान फ्रँकोइस बायरो यांच्याविरोधात विश्वासदर्शक ठराव आणण्यात आला होता, ज्यात त्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यानंतर देशभर आंदोलनाची ठिणगी पेटली आहे.
“ब्लॉक एव्हरीथिंग” म्हणजे काय?
या मोहिमेमागचा उद्देश असा आहे की देशातील राजकीय व्यवस्था जनतेसाठी काम करत नाही, त्यामुळे संपूर्ण यंत्रणा थांबवली पाहिजे. आंदोलक महामार्ग, वाहतूक व्यवस्था आणि प्रमुख शहरं बंद करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता
फ्रेंच माध्यमांच्या माहितीनुसार, सुमारे 1 लाख लोक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र, परिस्थितीवर नियंत्रण येईपर्यंत आणखी गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.