गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मौजा ताटीगुडम (ग्रामपंचायत कमलापूर) येथे एका खाजगी विहीरीतून गरम पाणी येत असल्याची घटना समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले होते. परंतु, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या भूशास्त्रीय तपासणीत या घटनेमागील खरे कारण उघड झाले आहे. चुनखडक खडकातील रासायनिक अभिक्रियेमुळे (एक्झोथर्मिक रिऍक्शन) पाणी गरम झाले असल्याचे कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार यांनी स्पष्ट केले आहे.
घटनेचा उगम आणि तपासणी
८ सप्टेंबर रोजी सत्यांना मलय्या कटकु यांच्या विहीरीतून गरम पाणी येत असल्याची माहिती मिळताच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी पाहणी केली. सुमारे २० वर्षे जुनी ही विहीर १.३० मीटर व्यासाची आणि ७.८० मीटर खोल आहे. सहा महिन्यांपूर्वी या विहीरीतील गाळ काढण्यात आला होता. तपासणीदरम्यान विहीरीच्या पाण्यात पांढरे कण आढळले आणि सबमर्सीबल पंपावर पांढरा थर दिसून आला.
भूशास्त्रीय अभ्यासात महत्वाचे निष्कर्ष
तपासणीदरम्यान भूशास्त्रीय अभ्यासात परिसरात चुनखडक म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट खडक असल्याचे निष्पन्न झाले. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असता या विहीरीच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा तब्बल ९२३ मि.ग्रॅ./लिटर आढळली.
विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी गाळ काढल्यामुळे पाण्याचा संपर्क जमिनीखालील चुनखडकातील कॅल्शियम ऑक्साइडशी आला. या खडकाची पाण्यासोबत झालेली उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया (एक्झोथर्मिक रिऍक्शन) होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार झाले आणि त्यातून उष्णता निर्माण झाली. परिणामी विहीरीतील पाणी गरम झाले असल्याचे वैज्ञानिक तपासणीत स्पष्ट झाले.
ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेले कुतूहल
४ सप्टेंबरला सत्यांना मलय्या कटकु यांच्या लक्षात आले की विहीरीचे पाणी असामान्यरीत्या गरम आहे. ही बातमी गावात पसरताच ग्रामस्थांनी विहीरीजवळ गर्दी केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की पाणी एवढे गरम होते की त्यात थंड पाणी मिसळल्याशिवाय हात घालता येत नव्हता. तसेच विहिरीत बुडबुडे येत होते आणि वाफही दिसत होती. त्यामुळे लोकांमध्ये विविध अफवा पसरू लागल्या. काहींनी हे भूगर्भीय ज्वालामुखी क्रियेचे लक्षण असावे असा अंदाज व्यक्त केला.
प्रशासनाचा अहवाल आणि नागरिकांना सूचना
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या अहवालानंतर ग्रामस्थांना भीती न बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा कोणत्याही ज्वालामुखी क्रियेशी किंवा नैसर्गिक आपत्तींशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याच्या नमुन्यांची नियमित तपासणी केली जाणार असून पाणी पिण्यास योग्य आहे की नाही याविषयी अंतिम अहवाल लवकरच जाहीर होणार आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली असली तरी भूशास्त्रीय तपासणीतून हे नैसर्गिक रासायनिक अभिक्रियेचे परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.