पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पैशांची ऑफर दिल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे हाके यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच अखेर त्यांनी मौन तोडत या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हाके म्हणाले, “व्हिडिओत दाखवलेली दोन्हीकडची नंबर्स आहेत. कुणाला वाटत असेल की आम्ही पैसे घेतले आहेत किंवा कायदा मोडला आहे, तर आम्हाला उचलून जेलमध्ये टाका.”
त्यांनी पुढे सांगितले की, “आम्ही ओबीसींसाठी चळवळ उभी करत आहोत. रात्रंदिवस मेळावे, आंदोलनं करत आहोत. काही लोक उदार अंतकरणाने मदत करत असतात, पण त्या गोष्टींची रेकॉर्डिंग करून व्हायरल करणे हे आंदोलन बदनाम करण्याचा आणि थांबवण्याचा कट आहे.”
हाके यांनी स्पष्ट केले की ते या व्हायरल क्लिपला फारशी किंमत देत नाहीत. “माझ्यावर अनेक दिवसांपासून हल्ले होत आहेत, आरोप होत आहेत. पण मी ओबीसींसाठी आवाज उठवत राहणारच. ओबीसींची चळवळ महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर उभी राहणार आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रकरण काय आहे?
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना पेट्रोलसाठी पैसे देण्याची ऑफर दिल्याचे ऐकू येते. “पेट्रोलसाठी पैसे द्यायचे आहेत, कॅशमध्ये देऊ का? फोनपे किंवा गुगलपेवर देता येईल का?” असा प्रश्न तरुणाने विचारल्याचे क्लिपमध्ये आहे. यावर हाके यांनी “भेटायला या,” असे सांगितले आणि नंतर आपल्या ड्रायव्हरचा यूपीआय नंबर देऊन ऑफर स्विकारली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.