नागपूर :
राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. २ सप्टेंबरला राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत जीआर काढल्यावर ओबीसी समाजाने नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ, इतर ओबीसी नेते आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण उभे राहिले आहे.
आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी एक मोठा दावा केला आहे. “अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले की, ‘अलिबाबा’ म्हणजे छगन भुजबळ आणि ‘परळी गँग’ अशा दोन-तीन जणांकडून अजित पवारांना संपवण्याचा घाट घातला जात आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
- “परळीचं घराणं आधी अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं, परंतु पवारांमुळे मुंडेंचं अर्ध घराणं मोठं झालं. छगन भुजबळांच्या षडयंत्रामध्ये ते सहभागी झाले आहेत,” असे मनोज जरांगे यांनी आरोप केला.
- त्यांनी सांगितले की, “अजित पवारांनी मोठं करून देखील या ‘अलीबाबा’ आणि आणखी दोन-तीन जणांनी आतून षडयंत्र सुरू केलं आहे.”
- जरांगे यांनी छगन भुजबळांवरही टीका केली: “शिवसेना प्रमुखांनी जे माणूस मोठं केलं, त्यांचं कुटुंब आणि पक्ष उद्ध्वस्त केला, आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत षडयंत्र रचायला लागले आहेत.”
राजकीय वर्तुळात मनोज जरांगे यांच्या या विधानानंतर चर्चांना जोर आलाय, आणि पुढील दिवसांत या विषयावर अधिक राजकीय गदारोळ होण्याची शक्यता आहे.