नागपूर :
ओबीसी समाजाचा मोर्चा नागपूरमध्ये निघणार असून, यावर मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “काढू दे मोर्चे, दमले पाहिजे ते पण. १६ टक्के मराठ्यांचं आरक्षण खाल्लं आणि आता ताकद दाखवतायत,” असे ते म्हणाले.
जरांगे पाटील म्हणाले, “सरकार पण त्यांची मजा बघतंय. त्यांचं म्हणणं म्हणजे कायदा नाही. आम्ही मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेटच्या आधारे जीआर काढला. पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा आणि औध संस्थानच्या आधारे गॅझेट निघतंय. त्यामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही.”
“OBC चा खरा घात काँग्रेसनेच केला”
जरांगे पाटील यांनी काँग्रेसवर थेट आरोप करत म्हटलं की,
“ओबीसींच्या ३७४ जाती संपवल्या कोणी? वडेट्टीवार म्हणतात सगळं तुम्हालाच पाहिजे, पण ओबीसींना खोटं, बोगस आरक्षण दिलं ते काँग्रेसच्या नेत्यांनीच. मंडल आयोगाने १४ टक्के आरक्षण दिलं होतं, तरी त्यांनी मराठ्यांचं १६ टक्के कमी करून दिलं. ओबीसींची खरी फसवणूक काँग्रेसनेच केली.”
त्यांनी पुढे म्हटलं, “येवल्याचे अलीबाबा आणि काँग्रेसचे पूर्वीचे नेते हेच ओबीसींच्या घातामागे आहेत. आता ओबीसी बांधवांनी विचार करावा की त्यांची फसवणूक कोणी केली.”
“धनगर आणि बंजारा समाजासोबत संवाद हवा”
धनगर आणि बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरही जरांगे पाटील म्हणाले,
“धनगर, बंजारा, आदिवासी बांधवांनी एकत्र बसून गैरसमज दूर करावेत. जर त्यांच्या नोंदी असतील तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. संवादातून तोडगा काढणं हाच योग्य मार्ग आहे.”
“मराठे सज्ज झाले आहेत”
जरांगे पाटील म्हणाले, “आता जीआर निघालाय. मराठे सज्ज झाले आहेत. प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी करणं गरजेचं आहे. आम्ही संघर्षातून मिळवलंय, आणि मिळवलेलं कधीच सोडणार नाही.”