छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी – मराठा समाज ओबीसी आरक्षणात “घुसखोरी” करत असल्याची टीका राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट प्रतिउत्तर दिलं आहे. “मराठा समाज १८८१ पासूनच ओबीसी आरक्षणात आहे. मंत्री छगन भुजबळ १९९४ मध्ये राजकारणात आले. त्यामुळे आम्ही घुसखोरी केलेली नाही, तर हा आमचा अधिकृत प्रवेश आहे,” असं ते म्हणाले.
शुक्रवारी (दि.५) सकाळी शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले –
- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसकट मराठा आरक्षण देणार नाहीत, असं सांगतात. पण मराठवाड्यातील मराठे आरक्षणाच्या कक्षेत जाणार आहेत, यात कोणताही संभ्रम नाही.”
- “आम्ही सुधारित जीआर काढण्याची मागणी केली आहे. आरक्षणाची प्रक्रिया, प्रमाणपत्रांचे वाटप कधीपासून सुरू होणार याबाबतही सरकारसोबत चर्चा झाली आहे.”
“जीआर निघालाय, अंमलबजावणी होणारच”
जरांगे पुढे म्हणाले –
“छगन भुजबळ यांना जीआर चांगला समजतो, कारण त्यांनी सत्तेचा व मंत्रिपदाचा अनुभव घेतलाय. मात्र आता जीआर निघालाच आहे आणि त्याची अंमलबजावणी होणार हे निश्चित आहे. मराठा समाज शांततेत मुंबईत गेला आणि विजय घेऊन परतलाय. नेमकं काही नेते माझ्या विरोधात का बोलतात, हे मला ठाऊक नाही. पण आमचा हक्क आम्ही मिळवलाय.”
मंडल आयोगालाच आव्हान
भुजबळ यांनी हैद्राबाद गॅझेटवरील जीआरविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले –
“हैद्राबाद गॅझेट हा सरकारी दस्तऐवज आहे. कोर्टानं काही निर्णय दिला तरी आम्ही थेट मंडल आयोगालाच आव्हान देऊ. त्यामुळे आरक्षण प्रक्रियेवर कुठलाही परिणाम होणार नाही.”