नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत सातव्या हप्त्याचे अनुदान जाहीर

बातमी इतरांना पाठवा

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यासंदर्भात कृषी विभागातर्फे शासन निर्णय निर्गमित झाला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या सातव्या हप्त्याचा थेट लाभ ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना होणार असून यासाठी तब्बल १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असून अतिवृष्टीसारख्या संकटांमध्ये दिलासा मिळत आहे.

केंद्र आणि राज्य शासनाचा संयुक्त लाभ

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी ६,००० रुपये अनुदान दिले जाते. त्यातच राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आणखी ६,००० रुपये वार्षिक अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण १२,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळत आहे.

आतापर्यंत राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना सहा हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता सातव्या हप्त्याद्वारे एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीतील अनुदान थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे.

शासनाचा शब्द पाळला – कृषीमंत्री भरणे

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “राज्य सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग सातत्याने काम करीत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही त्याचेच उदाहरण आहे. सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.”

अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा

महाराष्ट्रात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर सातवा हप्ता शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. तसेच बाधित पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे कामही सरकारकडून सुरू असल्याचे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होते. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो आणि लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत मदतीचा प्रत्येक रुपया थेट पोहोचतो. या योजनेंतर्गत लाखो शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत मिळत असल्याने शेतीशी निगडित अनेक समस्या कमी करण्यास मदत होते.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आणि आधार देणारी योजना ठरली आहे. सातव्या हप्त्याची घोषणा झाल्यामुळे कोट्यवधी शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचे हास्य उमटले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या या संयुक्त उपक्रमामुळे शेतकरी बांधवांना प्रत्यक्षात आर्थिक आधार मिळत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे.


बातमी इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.