नाशिक : मंत्री माणिकराव कोकाटे – क्रीडा धोरणात खेळाडू हिताला प्राधान्य

बातमी इतरांना पाठवा

नाशिक: राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये आयोजित विकसित महाराष्ट्र २०४७ युवा व क्रीडा संवाद कार्यक्रमात सांगितले की, क्रीडा धोरण तयार करताना खेळाडूंच्या हिताचा विचार केला जाईल आणि त्यांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध होतील.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पुढाकाराने गुरूदक्षिणा सभागृहात सोमवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंत्री कोकाटे यांनी सांगितले की, २०४७ पर्यंतच्या क्रीडा धोरणाच्या तयारीसाठी सूचना व अभिप्राय विचारात घेतले जातील. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांमध्ये सूचना पेट्या बसवण्यात येतील, तर जिल्हा क्रीडा संकुलांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

नंदुरबार येथे सिथेंटिक ट्रॅक उपलब्ध करण्यासाठी आठ दिवसांत कार्यवाही केली जाईल. तसेच, हरियाणा व ओडिशा राज्यांकडून चालू असलेल्या क्रीडा विकास प्रकल्पांचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला जाईल. मैदानांच्या विकासासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल आणि क्रीडांगण विकासासाठी निधी वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत.

क्रीडा आयुक्त शीतल उगले-तेळी यांनी नमूद केले की, क्रीडा धोरणात सुधारणा केली जात आहे, सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत. राज्य क्रीडा विकास निधी स्थापन करण्यात आला असून, मिशन लक्षवेध अंतर्गत १२ खेळांची निवड करण्यात आली आहे. यासाठी अत्याधुनिक सुविधा आणि साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. आगामी काळात क्रीडा विभागाच्या कामकाजात एआय तंत्रज्ञानाचा वापर होईल.

यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, नौकानयनपटू ऋषिकेश शिंदे, पूजा तांबे, कौसल्या पवार, शैलजा जैन, बळवंत निकुंभ, खुशाल शर्मा, मयूर ठाकरे, प्रणव गावित, कविता पाटील (नंदुरबार) आणि इतरांनी विविध सूचना केल्या. तसेच आंतरराष्ट्रीय नौकानयनपटू दत्तू भोकनळ, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.


बातमी इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.