मुंबई : राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) या दोन्ही योजनांना एकत्रित करून एकच सर्वसमावेशक आरोग्य योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत २,३९९ उपचारांना मंजुरी देण्यात आली असून, यामुळे लाखो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ प्रत्यक्ष उपस्थित होते, तर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.
बैठकीतील महत्वाचे निर्णय
- उपचारांची संख्या २,३९९ वर: या योजनेत नव्याने २५ उपचारांचा समावेश करण्यात आला आहे, जे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध होतील.
- अवयव प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र निधी: हृदय, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो यांसह नऊ प्रकारच्या महागड्या प्रत्यारोपण उपचारांसाठी स्वतंत्र कॉर्पस फंड तयार करण्यात येणार आहे.
- देयक प्रणाली सुधारणा: रुग्णालयांना देयके वेळेवर मिळण्यासाठी नवे पेमेंट सिस्टीम लागू होणार.
- TMS 2.0 शी सुसंगती: राज्यातील ४३८ उपचारांची यादी टीएमएस २.० प्रणालीशी जुळवून घेण्यात येणार.
- AI आधारित अॅप: कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅप आणि चॅटबॉट तयार करून रुग्णांना उपचार, रुग्णालये आणि लाभांची माहिती सोप्या पद्धतीने मिळेल.
ग्रामीण व शहरी भागावर लक्ष
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ज्या तालुक्यांत ३० खाटांचे रुग्णालय नाही, त्या ठिकाणी २० खाटांपेक्षा कमी क्षमतेच्या रुग्णालयांचा समावेश करावा. तसेच ग्रामीण भागात आरोग्य मित्रांची संख्या वाढवावी जेणेकरून योजनांचे लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील. खाजगी रुग्णालयांना प्रोत्साहन देऊन सुविधा सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.
योजनांची पारदर्शक अंमलबजावणी
या योजनेची अंमलबजावणी अधिक वेगवान आणि पारदर्शक होण्यासाठी खास उपाययोजना करण्यात येणार आहेत. रुग्णालयांच्या सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्ता प्रमाणित रुग्णालयांना अतिरिक्त प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे.
सामान्य नागरिकांना मोठा फायदा
या निर्णयामुळे राज्यातील गरीब आणि वंचित घटकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल. महागडे उपचार आता सहज उपलब्ध होतील, विशेषत: ज्या रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे त्यांना मोठा दिलासा मिळेल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या योजनेमुळे महाराष्ट्र लवकरच देशातील टॉप ३ राज्यांमध्ये स्थान मिळवेल. योजनेत सुधारणा आणि डिजिटल पारदर्शकता यामुळे रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील.”