पुणे : पुणे शहरातील कुख्यात बंडू आंदेकर टोळीवर आता पाचव्यांदा मकोका (MCOCA) लागू करण्यात आला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंदा कोमकर याचा खून केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी कडक कारवाई करत आंदेकर टोळीचा संपूर्ण खेळ खल्लास करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे पोलिस आयुक्तांनी आदेश देताच आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीच्या 13 सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बंडूअण्णा राणोजी आंदेकर (64), तुषार वाडेकर (24), स्वराज वाडेकर (21), वृंदावनी वाडेकर (40), अमन युसूफ पठाण उर्फ खान (22), सुजल मेरगू (23), अमित पाटोळे (19) आणि यश पाटील (19) यांचा समावेश आहे.
अडीच दशकापासून पुण्यात दहशत माजवणाऱ्या आंदेकर टोळीवर यापूर्वीही मकोका लागू करण्यात आला आहे. 2017-18 मध्ये समर्थ पोलिसांनी पहिला मकोका लावला होता. त्यानंतर 2020-21 मध्ये कोंढवा आणि खडक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक, तसेच निखिल आखाडे खून प्रकरणी चौथ्यांदा मकोका लावण्यात आला होता. आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता पुन्हा पाचव्यांदा मकोका लागू करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांकडून टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील कारवाई सुरू असून कोमकर हत्या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईने पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.