Pimpri Chinchwad: पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील एका चित्रपटगृहात धक्कादायक घटना घडली आहे. चित्रपट पाहताना फक्त “स्टोरी आधी सांगू नका” अशी विनंती केल्यावर एका 29 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आपल्या पत्नी आणि बहिणीसह चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी मागील रांगेत बसलेल्या एका दाम्पत्याने सतत सिनेमाची कथा सांगत गोंधळ घालणे सुरू केले. त्यामुळे फिर्यादीने शांत बसण्याची आणि स्टोरी आधी न सांगण्याची विनंती केली. यामुळे संतापलेल्या आरोपीने तरुणाची कॉलर पकडली, त्याला जमिनीवर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या हाणामारीत पीडित तरुणाच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला दुखापत झाली आहे. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या त्याच्या पत्नीवरही आरोपी दाम्पत्याने हल्ला केला आणि शिवीगाळ केली.
या घटनेनंतर पीडित तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अकिब जावेद निसार पटेल व एका महिलेवर भारतीय न्याय संहिता कलम 117, 115 आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.