गणेशोत्सव म्हटला की उत्साह, भक्ती आणि एकत्रितपणाचं वातावरण. मात्र पुण्यात यंदा एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग घडला आहे. कर्वेनगरमधील गुलाम गौस रज्जाक शेख उर्फ बाबू शेख यांनी तब्बल ४५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या घरी प्रथमच गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यांच्या या पावलाने समाजात एकात्मतेचा आणि धार्मिक सौहार्दाचा संदेश दिला आहे.
४५ वर्षे मंडळात कार्य, यंदा घरी गणपती
बाबू शेख हे गेल्या अनेक दशकांपासून स्थानिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. मात्र घरी गणपती आणण्याची त्यांची इच्छा अनेक वर्ष अपूर्ण राहिली होती. अखेर यंदा त्यांनी ती पूर्ण करत बाप्पाला घरी विराजमान केले.
घरातील सर्वांचा सहभाग
शेख यांच्या घरातील देव्हाऱ्यात बाप्पाची सुंदर आरास करण्यात आली आहे. पत्नी मुमताज यांनी नैवेद्य, आरतीत मनापासून सहभाग घेतला. मुलगी आफ्रिन, मुलगा आसिद, सून अंजु आणि नातवंडे यांनीदेखील भक्तिभावाने बाप्पाच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले.
या प्रसंगाने हे स्पष्ट केलं की श्रद्धा आणि भक्तीला धर्माच्या चौकटीची गरज नसते.
समाजासाठी आदर्श ठरणारा संदेश
बाबू शेख म्हणाले, “गेल्या ४५ वर्षांपासून मी गणेश मंडळात सक्रिय आहे. माझ्या मनात नेहमी इच्छा होती की, बाप्पाला माझ्या घरी आणावं. अखेर यंदा गणपती घरी आल्याने माझं स्वप्न पूर्ण झालं.”
त्यांच्या या कृतीने समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं आहे.
लाल महालाचं हुबेहूब स्वरूप घरात
पुण्याच्या गणेशोत्सवात ऐतिहासिक देखावे विशेष आकर्षण ठरतात. यंदा नारायण पेठेतील संकेत सोपान बलकवडे यांनी आपल्या घरातील बाप्पासाठी हुबेहूब लाल महाल उभारला आहे.
महिनाभर मेहनतीनंतर तयार लाल महाल
बलकवडे यांनी संपूर्ण एक महिना घालवून हा लाल महाल तयार केला. त्यासाठी NDF लाकडाचा वापर करण्यात आला असून सर्व डेकोरेशन त्यांनी स्वतः केलं आहे. यापूर्वी विश्रामबागवाडा आणि इतर ऐतिहासिक देखावे त्यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात साकारले आहेत.
लाल महालाचं ऐतिहासिक महत्त्व
लाल महाल हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या आठवणींशी जोडलेले स्मारक आहे.
- याच महालात शिवाजी महाराजांचे बालपण गेले.
- स्वराज्यनिर्मितीची खलबतं याच ठिकाणी झाली.
- शाहिस्तेखानावर झालेला हल्ला देखील लाल महालाशी निगडित आहे.
इतिहास जिवंत ठेवण्याचा हा उपक्रम पुण्याच्या गणेशोत्सवाला विशेष ठरतो.
दोन उदाहरणं, एकच संदेश
बाबू शेख यांनी धर्मभेद विसरून गणपती आणला आणि बलकवडे यांनी इतिहास जिवंत केला. या दोन्ही घटनांनी गणेशोत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा उत्सव असल्याचं पुन्हा सिद्ध केलं आहे.