रत्नागिरी : रत्नागिरीतील गाजलेल्या भक्ती मयेकर खून प्रकरणाशी संबंधित तिहेरी हत्याकांडामधील पहिल्या खुनाची मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. कळझोंडी येथील सीताराम वीर यांचा खून दुर्वास पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांनी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
२९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम वीर यांना खंडाळा येथील सायली बारमध्ये बोलावण्यात आले. येथे दुर्वास पाटील आणि त्याच्या दोघा सहकाऱ्यांनी सीतारामला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे सीतारामचा मृत्यू झाला. मात्र ही घटना दारूच्या नशेत पडल्यासारखी भासवून लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दुर्वास पाटीलने खंडाळा रिक्षा स्टँडवरून एक रिक्षा चालक बोलावून सीताराम वीर यांना घरी पाठवले. रिक्षा चालकाने पोलिसांना सांगितले की सीताराम वीर बेशुद्धावस्थेत होते आणि त्यांना कळझोंडी येथील घरी सोडण्यात आले. घरच्यांनी मृत्यू नैसर्गिक असल्याचे समजून अंत्यविधी उरकला आणि पोलिसांना माहिती दिली नाही.
तपासादरम्यान पोलिसांनी रिक्षा चालकाचा जबाब नोंदवला असून त्याने घटनेचे सर्व तपशील सांगितले आहेत. या खुनामध्ये दुर्वास पाटीलसोबत त्याचा बाप दर्शन पाटील याचाही हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुर्वासला संशय होता की सीताराम वीर त्याच्या प्रेयसी भक्ती मयेकरला कॉल करून त्रास देत आहे. त्यामुळे “धडा शिकवायचा” म्हणून दुर्वासने सीतारामला मारहाण केली, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा तपास जिल्हा परिषद सदस्य नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या तपासामुळे तिहेरी हत्याकांडाची गुत्थी सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.