मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून तणाव वाढत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांनी सरकारने नेमलेल्या दोन वेगवेगळ्या समित्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे आणि सामाजिक एकतेचे आवाहन केले आहे.
शरद पवारांचे वक्तव्य
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पवार म्हणाले –
“गेल्या काही दिवसांत समाज-समाजामध्ये संघर्ष वाढतोय. कालच बंजारा समाजाने मोठा मोर्चा काढून एसटी कोट्यात सामावून घेण्याची मागणी केली. दुसऱ्या दिवशी आदिवासी समाजाने त्यास विरोध केला. अशा प्रकारे दोन समाजात तणाव वाढत आहे. मला वाटतं की राज्य सरकार पावले टाकत आहे, पण ती योग्य आहेत की नाही हे पाहावं लागेल.”
दोन समित्यांवर पवारांचा सवाल
राज्य सरकारने मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी दोन वेगळ्या उपसमित्या नेमल्या आहेत. यावर पवार म्हणाले –
“सरकारने दोन समित्या नेमल्या, पण एका जातीची समिती असेल तर दुसऱ्या घटकांचा विचार होणार नाही. हे प्रश्न सोडवायचे असतील तर एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल.”
सामंजस्याचे आवाहन
पवार यांनी पुढे सांगितले –
“वेगवेगळं बसून चालणार नाही, सामंजस्य निर्माण करायचे असेल तर सर्व घटकांना एकत्र बसवून चर्चा केली पाहिजे. आमचा दृष्टीकोन समाजातील एकता जपण्याचा आहे.”
फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले –
“जर माझ्या वक्तव्याचा अर्थ वाय आहे असं त्यांना वाटत असेल, तर मला काही म्हणायचं नाही. पण कटुता थांबवून समाजात एकत्रतेचं वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनीही यासाठी हातभार लावावा.”