बीड: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. हैद्राबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोमवारी बीडमध्ये विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरले आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडली.
या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहिले होते. मात्र, त्यांच्या एका वक्तव्यामुळे बंजारा समाज आक्रमक झाला आहे. मुंडे यांनी आपल्या भाषणात “वंजारी आणि बंजारा एकच आहेत” असे वक्तव्य केले. यावरून मोर्चात घोषणाबाजीचा भडका उडाला आणि समाजबांधवांनी मुंडेंकडे शब्द मागे घेण्याची मागणी केली.
बंजारा समाजाची भूमिका
मोर्चादरम्यान समाजबांधवांनी स्पष्ट केले की, वंजारा आणि बंजारा हे दोन्ही समाज वेगळे आहेत. “1994 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी वंजारा-बंजारा एक आहेत असं सांगून आमचं अडीच टक्के आरक्षण काढून घेतलं. आम्ही वेगळ्या भाषा, वेगळ्या संस्कृतीचे आहोत. परत तोच अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा देत समाजाने जोरदार घोषणाबाजी केली.
बंजारा समाजाच्या नेत्यांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली आहे की, हैद्राबाद गॅझेटनुसार समाजाला एसटी प्रवर्गात तात्काळ समाविष्ट करावं. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात सरकारकडे बंजारा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली. “मी नशीबवान आहे की आज मंत्री नाही, त्यामुळे तुमच्यात आलो. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. आरक्षणासाठी सरकारने अभ्यास गट नेमा किंवा समिती नेमा, पण समाजाला हक्काचं आरक्षण द्या,” असे मुंडे म्हणाले. मात्र, त्यांचे “वंजारा-बंजारा एकच आहेत” हे वक्तव्यच चर्चेचा विषय ठरलं आहे.
बीडमध्ये तणावाचं वातावरण
मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर समाजबांधवांनी संतप्त घोषणाबाजी केली. “शब्द मागे घ्या,” अशी मागणी करून मुंडेंच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनामुळे बीड शहरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राजकीय वादाची शक्यता
या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. वंजारा व बंजारा समाजातील मतभेद पुन्हा एकदा पुढे आले आहेत. आगामी काळात हा वाद राजकीय रंग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.