पुणे (प्रतिनिधी): पुणे-नगर महामार्गावरील वाघोली परिसरात रविवारी पहाटे भीषण खूनाची घटना घडली. वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला असून, तिघे आरोपी घटनेनंतर पसार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
खून झालेल्या तरुणाचे नाव बादल शेख (वय २४, रा. खराडी) असे आहे. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादल शेख याच्याविरोधात यापूर्वी मारामारीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्याशी संबंधित तिघा आरोपींशी काही दिवसांपासून वाद सुरू होता.
रविवारी पहाटे सुमारास बादल शेख आणि आरोपी दुचाकीवरून वाघोलीतील उबाळेनगर येथील एका लॉजवर आले. तेथे पुन्हा वाद उफाळला. संतापाच्या भरात तिघांनी बादल शेख याला बेदम मारहाण केली आणि डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी तिघे जण पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, खुनाचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.