पुणेकरांच्या गतीमान प्रवासासाठी मोठा निर्णय घेण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हाती घेणार असलेल्या येरवडा ते कात्रज या भुयारी मार्ग प्रकल्पाचा अंतिम निर्णय पुढील दीड महिन्यात होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ७५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सहा लेनच्या दोन मोठ्या भुयारी मार्गांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या प्रकल्पाच्या उपयुक्ततेचा सखोल अभ्यास करण्यासाठी पीएमआरडीएने ‘मोनार्क’ या पुण्यातील नामांकित एजन्सीची नेमणूक केली आहे. सध्या ही एजन्सी मार्गावरील वाहतूक प्रवाह, दररोज होणारी कोंडी, वाहने वळवण्याचे पर्याय आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर होणारा वाहतूक कमी होण्याचा अंदाज यावर काम करत आहे. तीन महिन्यांच्या या सर्वेक्षणाचा अहवाल पुढील दीड महिन्यात तयार होऊन सादर केला जाणार आहे. अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकार या प्रकल्पाला हिरवा कंदील द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय घेणार आहे.
येरवडा ते कात्रज मार्ग हा पुण्यातील वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग आहे. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रोज लाखो नागरिक प्रवास करतात. बाहेरील तालुके, जिल्ह्यांमधून येणाऱ्या वाहनांमुळेही वाहतुकीवर मोठा ताण पडतो. रिंग रोड, महामार्ग जोडणी यांसारख्या प्रकल्पांबरोबरच हा भुयारी मार्ग झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांचा वेळही वाचेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी या प्रकल्पाची जबाबदारी घेतली असून, त्यांनी स्पष्ट केले आहे की, एवढा मोठा खर्च करण्यापूर्वी प्रकल्पाची उपयुक्तता सिद्ध होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीच सविस्तर अभ्यास आणि डेटा संकलन सुरू आहे. अहवाल सादर झाल्यानंतर सर्व बाबींचा विचार करूनच प्रकल्पावर शिक्कामोर्तब होईल.
पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येसह वाहनसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे ही वेळेची गरज आहे. येरवडा-कात्रज भुयारी मार्ग प्रकल्प मंजूर झाल्यास तो पुणेकरांसाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरेल.